Ad will apear here
Next
बाबा आमटे, डॉ. प्रकाश आमटे, लालन सारंग, पंडितराव नगरकर
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे, डॉ. प्रकाश आमटे, लालन सारंग, पंडितराव नगरकर यांचा २६ डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय...
.....
बाबा आमटे : 
समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे, त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे बाबा म्हणजेच मुरलीधर देविदास आमटे. वर्धा जिह्यातल्या हिंगणघाट येथे २६ डिसेंबर १९१४ रोजी त्यांचा जन्म झाला.

बाबांचं घराणं सधन जहागीरदाराचं. त्यांचे वडील देविदास ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी होते. मुरलीधर आमटे यांना त्यांच्या लहानपणीच बाबा हे टोपणनाव मिळालं होतं. बाबांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं होतं आणि वर्धा येथे त्यांनी वकिलीही केली. ते यशस्वी वकील म्हणून नावाजले होते; पण तिथे त्यांचं मन रमलं नाही. त्यांनी वकिली सोडून स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून दिलं. बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत त्यांना कारावासाची शिक्षाही झाली. महात्मा गांधींच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. म. गांधींबरोबरच रवींद्रनाथ टागोर, विनोबा भावे आणि साने गुरुजी ही बाबांची श्रद्धास्थानं होती. 

१९४६ साली त्यांचा साधनाताईंशी विवाह झाला. साधनाताई बाबांच्या सर्व सामाजिक कार्यांमध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी झाल्या आणि आयुष्यभर त्यांना साथ दिली. बाबा एकदा मुसळधार पावसात रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या कडेला भिजत, विव्हळत असहाय्यपणे पडलेल्या एका कुष्ठरोग्याला त्यांनी पाहिले आणि त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला. बाबांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिलं. महारोग्यांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन हा आश्रम आणि अपंगांसाठी आणि समाजातल्या रंजल्या-गांजल्यांसाठी आणखी दोन आश्रम सुरू केले. पर्यावरण, वन्यप्राणी संरक्षण आणि नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतरही अनेक सामाजिक-पर्यावरणसंबंधित चळवळींमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. 

ज्या काळात त्यांनी महारोग्यांच्या पुनर्वसनाचं कार्य हाती घेतलं, त्या काळात महारोग हा महाभयंकर समजला जात होता. महारोग्यांना कुणी जवळ करीत नसे. त्यामुळे त्यांच्या नशिबी अस्पृश्यांसारखे जीणे येत असे. असहाय्य रोगाने गांजलेले हे रोगी त्यामुळे मानसिकरित्याही खचून जात असत. त्या काळात महारोग हा संसर्गजन्य असतो, असा गैरसमज होता. आज आनंदवनात एक सुसज्ज हॉस्पिटल आहे. शाळा आहे आणि अनाथाश्रमही आहे. आनंदवनात पाच हजारांपेक्षाही जास्त लोक वास्तव्याला आहेत. आनंदवन प्रकल्प जगातील एक मान्यताप्राप्त प्रकल्प आहे. 

समाजकार्याबरोबरच मोजकंच, पण अतिशय सशक्त लेखनही त्यांनी केलं. ‘ज्वाला आणि फुले’ हा त्यांचा कवितासंग्रह अनेक तरुणांना प्रेरणा देऊन गेला. ‘उज्ज्वल उद्यासाठी’ हा काव्यसंग्रह आणि ‘माती जागवील त्याला मत’ ही त्यांची पुस्तकंही गाजली. बाबांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. कुष्ठरोग्यांसाठी कार्य करण्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे अमेरिकेचा डेमियन डट्टन पुरस्कार. हा पुरस्कार त्यांना १९८३ मध्ये प्रदान करण्यात आला. १९८५ साली आशियाचं नोबेल पारितोषिक समजले जाणारे रेमन मॅगसेसे पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रसंघाने १९९१ आणि १९९८ साली त्यांचा सन्मान केला. 

या व्यतिरिक्त त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. भारत सरकारने १९७१ साली पद्मश्री आणि १९८६ साली पद्मविभूषण देऊन त्यांना गौरवले. १९९८ साली त्यांना महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार आणि २००४ साली त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. काही वर्षं त्यांना शारीरिक व्याधीमुळे बसता येत नव्हतं, त्यांना सतत झोपून राहावं लागायचं, तरीही त्यांच्या कार्यांमध्ये कोठेही खंड पडला नाही. त्यांची दोन्ही मुलं विकास व प्रकाश आणि दोन्ही सुना डॉक्टर असून, बाबांचा समाजकार्याचा वारसा समर्थपणे सांभाळीत आहेत. त्यांच्या नातवंडांची तिसरी पिढीही आता समाजकार्यात उतरली आहे. बाबा आमटे यांचे ९ फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले.
....

डॉ. प्रकाश आमटे :  
समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र डॉ. प्रकाश आमटे यांचा २६ डिसेंबर १९४८ हा जन्मदिन. त्यांचे वडील बाबा आमटे यांचाही जन्मदिन २६ डिसेंबर. समाजकार्यात आदर्श निर्माण करणाऱ्या या वडील आणि मुलाच्या जोडीचा जन्मदिनांक एकच असावा, केवढा विलक्षण योगायोग.  

गडचिरोली जिल्हयाच्या पूर्वेला छत्तीसगडच्या सीमेलगत भामरागडच्या निबीड अरण्यात ४३ वर्षांपूर्वी २३ डिसेंबर १९७३ ला कर्मयोगी बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. अज्ञान, अंधश्रद्धा, मागासलेपणा, निरक्षरता यांच्या गर्तेत सापडलेल्या आदिवासींना प्रकाशमान करण्यासाठी त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाचे काम हाती घेतले. भोवताली जंगली श्वापदांचा वावर, शहरी माणसांना बघून दूर पळणारे आदिवासी आणि मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव अशा परिस्थितीत नुकताच एम. बी. बी. एस झालेला हा तरुण मुलगा आपल्या मंदाकिनी या सहचारिणीसह हेमलकश्यात दाखल झाला. तेव्हापासून ते आजगायत या दाम्पत्याची लोकसेवा अखंडितपणे सुरू आहे. आदिवासींना, रंजल्या-गांजल्यांना आपुले म्हणणारा, अनाथ, अपंगांना ह्दयाशी धरणारा आणि मुक्या व हिंस्त्र प्राण्यांना प्रेमाची भाषा शिकविणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे यांनी मागासलेल्या आदिवासींमध्ये प्रचंड सामर्थ्य निर्माण केले. लोकबिरादरी आश्रमशाळेतून बाराखडी गिरविलेले अनेक माडिया तरुण डॉक्टर, अभियंते, वकील झाले.  

२००८ मध्ये डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला. जनसेवेत समर्पित असलेले डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर ‘डॉ. प्रकाश आमटे : द रिअल हीरो’ या नावाचा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित करण्यात आला. ह्या चित्रपटात नाना पाटेकर ह्यांनी प्रकाश आमटेंची भूमिका केली असून, सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे, तेजश्री प्रधान यांच्या आणि २०० गोंड आदिवासी कलावंतांच्या भूमिका आहेत. याशिवाय त्यांच्या जीवनावर ‘हेमलकसा’ नावाचा एक हिंदी चित्रपटही आला आहे. फ्रान्सजवळील मोनॅको या देशाने डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित करुन त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. त्यांच्या सेवाकार्याचा वसा आता तिसऱ्या पिढीतील डॉ. दिगंत आमटे, अनिकेत आमटे व त्यांच्या सहचारिणी पुढे चालवीत आहेत.

लोकबिरादरी प्रकल्पाबद्दल अधिक माहिती http://www.lokbiradariprakalp.org/ या वेबसाइटवर मिळू शकते.  
.....

लालन सारंग : 
मराठी रंगभूमीच्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचा  २६ डिसेंबर १९४१ हा जन्मदिन. भारतीय रंगभूमीवरील बंडखोर अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांनी मराठी रंगभूमीवर सखाराम बाइंडर, रथचक्र  आणि कमला अशी बंडखोर नाटके करून आपला एक वेगळा ठसा उमटवला. लालन सारंग यांच्या आयुष्यातील ही तीन महत्वाची नाटकं. 

त्यातील त्यांच्या भूमिका कलावंत म्हणून त्यांचा कस पाहणाऱ्या तर होत्याच, पण त्याहीबरोबर जगण्याचं नवं भान देणाऱ्या होत्या. काळाच्या पुढे जाणाऱ्या अनेक भूमिका त्यांनी केल्या आणि त्यातून निर्माण होणारी वादळं अंगावर घेतली. लालन सारंग या तेंडुलकरांच्या नायिका म्हणून ओळखल्या जात. सखाराम बाईंडर, घरटे आमचे छान, बेबी, कमला अशा तेंडुलकरांच्या नाटकांनी लालन सारंग यांना बरच काही मिळवून दिलं. 

लालन सारंग मूळच्या गोव्याच्या; पण त्यांचं जन्मापासूनचं आयुष्य मुंबईत गेलं. पहिल्या वर्षी ‘बावळट मुलगी’ म्हणून दिग्दर्शक कमलाकर सारंग यांनी जिला हिणवलं त्याच लालन सारंग यांना त्यांनी पुढच्या वर्षी स्वत:च्या नाटकात रोल दिला. हे कसं झालं ? कमलाकर सारंग त्यांच्या प्रेमात पडले होते का? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी एका मुलाखतीत दिले होते, ‘त्यावेळेस तो माझा फक्त मित्र होता. पहिल्या नाटकानंतर आमची ओळख झाली, मग वेगवेगळ्या नाटकात काम करत असताना आमची ओळख वाढत गेली. कालांतरानं आम्ही एकाच संस्थेचं काम करू लागलो आणि आमची मैत्री झाली. त्यावेळेस प्रेमात वगैरे पडण्याचा संबंधच नव्हता कारण तो त्यावेळेस दुसऱ्या मुलीच्या प्रेमात होता. माझ्यासमोर तिच्याबरोबर फिरतही होता. पहिल्यापासूनच कमलाकरचं व्यक्तिमत्त्व जरासं वेगळं होतं. एक तर कोकणी माणसाप्रमाणे तो कुजकट बोलायचा; पण साहित्य, नाटक याचं त्याला प्रचंड नॉलेज होतं. एक प्रकारचं औदार्य त्याच्या व्यक्तिमत्त्वात होतं. त्यामुळे मला तो आवडायला लागला, पण त्याला तसं काही विचारायचं धाडस मी कधीच केलं नाही. पुढे त्याच्या बँकेच्या नाटकात जेव्हा मी काम केलं तेव्हा आमचं संभाषण जास्त वाढत गेलं. मग त्यानं मला लग्नासाठी विचारलं आणि मी हो म्हटलं.’

कमलाकर सारंगांविषयी बोलताना त्या म्हणतात, ‘नवरा वगैरेपेक्षा कमलाकर माझा चांगला मित्र होता. त्यानं उठसूठ माझी स्तुती केली नाही; पण तो एवढंच म्हणायचा की लालन जी भूमिका करते, त्याच्यासारखीच ती दिसते. त्याच्या आयुष्याला स्थैर्य कदाचित माझ्यामुळे मिळालं असेल; पण त्याच्याबरोबर माझी वाढ होत गेली.’ 

‘सखाराम बाईंडर’च्या आधीही लालन सारंग यांनी सहा व्यावसायिक नाटकं केली होती; मात्र ‘सखाराम बाईंडर’मधल्या चंपा या भूमिकेनं त्यांना नवी ओळख मिळवून दिली. तो त्यांच्या आयुष्यातला माइलस्टोन होता. हे नाटक म्हणजे त्यांच्या जीवनातलं एक वादळी पर्व. महाराष्ट्राच्या इतिहासात दुसऱ्या कोणत्याही नाटकावरून इतके वाद झाले नाहीत. एवढं वादळ झाल्यावरही कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शक म्हणून किंवा लालन सारंग यांनी अभिनेत्री म्हणून हे नाटक बंद पडू दिलं नाही. मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लालन सारंग सुगरण म्हणूनही प्रसिद्ध होत्या. ९ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांचे निधन झाले. 
.....

पंडितराव नगरकर :
मराठी रंगभूमीवरील व चित्रपटातील प्रसिद्ध गायक-नट पंडितराव नगरकर यांचा २६ डिसेंबर १९१० हा जन्मदिन. त्यांचे पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर, परंतु ते पंडितराव याच नावाने प्रसिद्ध होते. शाहीर होनाजी बाळा यांच्या जीवनावरील व्ही. शांताराम यांनी काढलेल्या अमरभूपाळी या चित्रपटात होनाजी बाळा यांची भूमिका पंडितराव नगरकर यांनी साकारली होती. १९५१ मध्ये आलेला हा चित्रपट खूप गाजला. होनाजीच्या भूमिकेला पंडितरावांनी न्याय दिला. त्या बोलपटात लता मंगेशकर आणि पंडितराव यांनी गायिलेली ‘घनःश्याम सुंदरा’ ही भूपाळी अविस्मरणीय ठरली. 

मधुर आवाज, मार्दवता हे त्यांच्या गायनातले उल्लेखनीय गुण होते. लहानपणापासूनच त्यांचा गायनाकडे कल होता. प्रथम सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे ओडियन कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांपैकी ‘जा के मथुरा’, ‘बोल हसरे बोल प्यारे’, ‘रामरंगी रंगले मन’ इ. गीतांच्या ध्वनिमुद्रिका बऱ्याच लोकप्रिय झाल्या. 

आकाशवाणीच्या मुंबई केंद्राशी त्यांचा संबंध सुरुवातीपासून होता. हरिभाऊ शुक्ल यांच्या मंगला नाटकात काम करून पंडितरावांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. पुढे सुलोचना पालकर हिच्या सहकार्याने पंडितरावांनी १९३४ साली ‘सुलोचना संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली व १९३७ पर्यंत कंपनीच्या नाट्यप्रयोगांत नायकाच्या भूमिका केल्या. संशयकल्लोळ तसेच खाडिलकर यांचे संगीत त्रिदंडी-संन्यास ही नाटके सुलोचना संगीत मंडळी करीत असे. त्यांशिवाय मृच्छकटिक, मानापमान, सौभद्र, लग्नाची बेडी, ना. सी. फडक्यांचे संजीवन इ. नाटकेही या संस्थेने रंगमंचावर आणली होती; मात्र १९३७ मध्ये कंपनी बंद पडली. 

त्यानंतर दामुअण्णा जोशी यांच्या ‘कला-विलास’च्या देहूरोड या नाटकात पंडितरावांनी काम केले. त्यातील ‘मी गातो नाचतो’ हे गाणे खूपच गाजले. १९७६मध्ये रांगणेकरांच्या ‘पिकली पाने’ या गद्य नाटकात त्यांनी भूमिका केली व ही त्यांची शेवटचीच भूमिका ठरली. पंडितराव नगरकर यांचे २८ जुलै १९७७ निधन झाले.

- संजीव वेलणकर 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZEWCH
Similar Posts
एस. एन. त्रिपाठी पौराणिक चित्रपट संगीताचे बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेले संगीतकार एस. एन. त्रिपाठी यांचा १४ डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय....
बापूराव पेंढारकर, रती अग्निहोत्री, मराठी रंगभूमीवर स्त्री भूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक बापूराव पेंढारकर, अभिनेत्री रती अग्निहोत्री यांचा १० डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय....
बाबा आमटे, राजा परांजपे, शोभना समर्थ, मीना शौरी ख्यातनाम समाजसेवक बाबा आमटे, नामवंत अभिनेते-दिग्दर्शक राजा परांजपे, अभिनेत्री शोभना समर्थ आणि अभिनेत्री मीना शौरी यांचा नऊ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
साधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून... पु. ल. देशपांडे या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वानं ‘गुण गाईन आवडी’ या पुस्तकात अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांविषयी लिहिलं आहे. त्या पुस्तकातच ‘बाबा आमटे : एक विज्ञानयोगी’ या १९६८ सालच्या मे महिन्यात लिहिलेल्या लेखाचाही समावेश आहे. बाबा आणि साधनाताई ही दोन नावं एकमेकांपासून वेगळी करता येण्यासारखी नाहीत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language